जाधववाडी (फ) येथे ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२३ | फलटण |
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियोजनबध्दरित्या करण्यासाठी जाधववाडी (फ) (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या वतीने ३१ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात गावातील ग्रामस्थ व महिलांसाठी शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या एकदिवसीय कार्यशाळेत आसरा सोशल फाऊंडेशन पुणे व यशदा पुण्याच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका श्रीमती अर्चना मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या सुरूवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, एस.एस. जगताप, श्रीमती अर्चना मोरे, सरपंच सीमा गायकवाड, विजयराव निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी दीपकराव सपकाळ, उपसरपंच सारिका चव्हाण, ग्रा.पं. सदस्य स्वाती जाधव, रेखा नाळे, सोनाली पवार, जिल्हा परिषद शाळेचे आदर्श मुख्याध्यापक वसंतराव जाधव, कृषी विस्तार अधिकारी दिलीप ननावरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर यांनी केले. ग्रामपंचायत जाधववाडी (फ) ही फलटण शहरालगत असून गावची लोकसंख्या २ हजारांवर गेली आहे. गावात ३०० घरे असून या घरातील घनकचरा दररोज तीन घंटागाड्यांमार्फत संकलन करून तो नगरपालिकेच्या कचरा डेपोवर टाकला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीला प्रतिमहिना रक्कम रू. ६० हजार खर्च येतो. तो वाचवून याचा उपयोग नागरिकांना अन्य सुविधा देण्यासाठी हा कचरा ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी व गावातील ३०० घरांच्या उंबर्‍याच्या आतच ओला व सुका कचरा व प्लास्टिकचे संकलन करून त्यापासून प्रत्येक घरमालकाला मोबदला मिळवून देण्यासाठी आज या कार्यशाळा उपयुक्त ठरतायंत, असे सांगितले.

गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी व ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या उन्नतीसाठी कचरा मोहीम गावात सुरू करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले. याचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्रीमती अर्चना मोरे यांनी कचरा ही संकल्पना जोपर्यंत शासकीय स्तरावर अधिकारी वर्ग त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या कार्यालयात राबवित नाहीत, तोपर्यंत गावातील नागरिकांमध्ये कचरा संस्कार रूजणार नाही, असे सांगून गाव शून्य कचरा करण्याअगोदर गावातील शासकीय कार्यालय कचरामुक्त करणे आवश्यक आहे, असे सांगितले. तसेच गावातील प्रत्येक घरातील ओला, सुका व घनकचर्‍याची विभागणी करून ओल्या कचर्‍यावर कल्चर टाकून खत तयार करणे, सुका कचरा टाकून खत तयार करणे, सुका कचरा वेगळा ठेवून प्रक्रियेला देणे व प्लास्टिक वेगळे करून विक्रीसाठी उपलब्ध ठेवून आर्थिक उन्नती करणे, याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. कचरा उघड्यावर टाकल्याने त्यापासून होणारे दुष्परिणाम व प्लास्टिकचे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सर व इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी आजची कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!