दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२३ । सातारा । महसूल विभागांमार्फत राज्यात दि. 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानुसार छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे उपविभागीय अधिकारी सातारा सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसिलदार सातारा राजेश जाधव यांच्या उपस्थितीत युवा संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
युवा संवाद कार्यक्रमांत उपविभागीय अधिकारी यांनी नवोदीत युवा मतदारांना मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीतील मतदानाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या विदयार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याकरिता फॉर्म नं. 6 चे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र आवश्यक असतात म्हणून महसूल विभागामार्फत देण्यात येणारे दाखले, प्रमाणपत्रांचे माहिती पत्रक वाटण्यात आले. सध्या शेतकरी बांधवांना पीकपाहणी ही स्वतः ऑनलाईन करणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेत युवा वर्गाला सहभागी करुन घेवून त्यांना त्यांचे 7/12 चे वाचन कसे करावयाचे, स्वतःची ई-पीक पाहणी कशी करावयाची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास अजय पाटील, उप प्राचार्य छत्रपती शिवाजी कॉलेज, प्रा. लोहार सर, मंडल अधिकारी सातारा श्री. इंगवले उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी सातारा आणि तहसिलदार सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये युवा संवादाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला.