रामराजेंच्या प्रयत्नातून साखरवाडी कारखाना सुरु झाल्याने शेतकर्‍यांचा मोठा प्रश्न सुटला: श्रीमंत संजीवराजे; साखरवाडीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ


स्थैर्य, साखरवाडी दि.9 : फलटण तालुक्यात साखरवाडी ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जुना कारखाना साखरवाडीत आहे. आर्थिक गर्तेत सापडलेला हा कारखाना ना.श्रीमंत रामराजेंच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु झाल्याने शेतकर्‍यांचा मोठा प्रश्न सुटला असल्याचे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

साखरवाडी, ता.फलटण येथील ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, तालुक्यात 80 ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत श्रीमंत रामराजे कधी लक्ष देत नाहीत. ग्रामपंचायत निवडणूकीचे वाद पुढे जावू नयेत हा माझा देखील प्रयत्न असतो. ग्रामपंचायतीमध्ये राजकारण आल्यानंतर ग्रामपंचायतीची काय अवस्था होते ते साखरवाडीकरांनी अनुभवलंय. गावाच्या विकासासाठी मतदारांनी जागृत राहून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.

ना.श्रीमंत रामराजे यांचे साखरवाडीवर नेहमीच लक्ष असते. साखरवाडीतील कारखाना पुन्हा सुरु झाल्याने शेतकर्‍यांचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे साखरवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची सत्ता निश्चितपणे येणार असल्याचा विश्वासही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!