शिवपराक्रमाच्या शिल्पासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

खासदार उदयनराजे यांचा हिंदू एकता आंदोलन समितीला शब्द


स्थैर्य, सातारा, दि. 5 नोव्हेंबर : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेले अफजलखान वधाचे शिल्प ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफझलखान कबर परिसरात तात्काळ बसवले जावे अन्यथा तिथीनुसार 27 नोव्हेंबर रोजी आंदोलन करू, असा इशारा हिंदू एकता आंदोलना समितीच्यावतीने देण्यात आला होता. या मागणीची तात्काळ दखल घेऊन, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत तात्काळ बैठक घेण्यात येईल, असा शब्द प्रतापगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. त्यामुळे आंदोलनाचा इशारा मागे घेण्यात आला आहे.

प्रतापगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर याबाबत नितीन शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली. या बैठकीला हिंदू एकतासमितीचे निमंत्रक अध्यक्ष व प्रतापगड प्राधिकरण समितीचे अशासकीय सदस्य नितीन शिंदे व मिलिंद एकबोटे उपस्थित होते. शिंदे म्हणाले, अफझलखान वधाचे शिल्प एक वर्षापासून तयार असतानाही, राज्य शासनाकडून कारणे दिली जात आहेत. शिवप्रताप दिन तिथीनुसार 27 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी या शिल्पाची स्थापना करून, राज्य शासनाने त्याचे उद्घाटन करावे अन्यथा सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमधील शिवप्रेमींच्या उपस्थितीत प्रतिशिल्प आणून, ते प्रतापगडाच्या पायथ्याला स्थापन केले जाईल. त्याचे उद्घाटन केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

मात्र, प्रतापगड प्राधिकरणाच्या बैठकीत खासदार उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलनाचा इशारा आम्ही. सध्या मागे घेत आहोत.


Back to top button
Don`t copy text!