साखरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विक्रम ढेंबरे बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी विक्रम बबनराव ढेंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

साखरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राजे गट विरुध्द विक्रम भोसले अशी लढत दिसून आली. या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावत विक्रम भोसले यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर व जनतेच्या आशीर्वादावर राजे गटाच्या विरोधात एकतर्फी खिंड लढवली. यात ऐतिहासिक विजय मिळवत ग्रामपंचायत ताब्यात घेत असताना विक्रम भोसले यांना त्यांचे सहकारी विक्रम ढेंबरे यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत नि:स्वार्थीपणे मोलाची साथ दिली. त्यांच्यासह इतर सहकार्‍यांच्या साथीमुळेच विक्रम भोसले ग्रामपंचायतीत किंगमेकर बनू शकले.

त्यावेळी सरपंचपदी सौ. रेखा संजय जाधव यांची निवड झाली होती, तर उपसरपंचपदी अक्षय रूपनवर यांची निवड करण्यात आली होती. रूपनवर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची निवडीची प्रक्रिया नुकतीच ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेखा संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी खंबीरपणे साथ देणार्‍या विक्रम ढेंबरे यांनाच संधी द्यायची, हे सर्वानुमते ठरले होते. त्यामुळे त्यांचाच एकमेव अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची उपसरपंचपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर विक्रम भोसले यांनी आपले सहकारी व नूतन उपसरपंच विक्रम ढेंबरे यांना फेटा बांधून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीपुढे फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

नूतन उपसरपंच विक्रम ढेंबरे यांचे माजी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील, विक्रम भोसले, सरपंच रेखा जाधव, सुरेश पवार, संभाजी जाधव, सुरेश भोसले, सागर कांबळे, निलेश भोसले, अजित भोसले, राजू गाडे, संदीप जाधव, आबा मोहिते, बंडू लोखंडे, विजयसिंह मोहिते, रवि पवार, विनोद भोसले, दादा मोहिते, दादा शिंदे, रमेश राऊत आदी प्रमुख मान्यवर, सर्व ग्रा. पं. सदस्य, युवक, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!