
विडणी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान दोन राजकीय गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परांविरोधात अदखलपात्र (NCR) गुन्हे दाखल केले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २९ एप्रिल : फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २८ एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, या मतदानाच्या दिवशीच गावातील दोन राजकीय गटांमध्ये हायस्कूल परिसरात अचानक तणाव निर्माण होऊन जोरदार शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी परस्परांविरुद्ध अदखलपात्र गुन्हे (N.C.R.) दाखल केले आहेत.
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार या प्रकरणाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
सरपंच सागर अभंग यांची डॉ. उत्तम शेंडे यांच्याविरुद्ध तक्रार
पहिल्या प्रकरणात विडणीचे विद्यमान सरपंच सागर कांतीलाल अभंग (वय ३९ वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास विडणी येथील हायस्कूलसमोरील परिसरात आरोपी डॉ. उत्तम राजाराम शेंडे यांनी त्यांना अडवून, “तू उभी केलेली ग्रामपंचायत सीट लागणार नाही, तू पडणार आहेस, तुझे इथं काय काम नाही,” असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलिसांनी डॉ. उत्तम शेंडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३५२ आणि ३५१(२) अन्वये अदखलपात्र गुन्हा (रजि. नं. ५०३/२०२६) दाखल केला आहे.
डॉ. उत्तम शेंडे यांची चार जणांविरुद्ध तक्रार
दुसऱ्या प्रकरणात डॉ. उत्तम राजाराम शेंडे (वय ७३ वर्षे) यांनी उलट तक्रार (Cross Complaint) दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी १) धीरज कांतीलाल अभंग, २) सागर कांतीलाल अभंग, ३) सचिन गजानन अभंग आणि ४) नंदकुमार केदारी अभंग (सर्व रा. विडणी) यांनी त्यांना गाठले. “तो कोपरा सभेत आमचे नाव घेऊन का बोलला,” असे म्हणत या चौघांनी डॉ. शेंडे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेले साक्षीदार डॉ. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे यांना धीरज अभंग याने हाताच्या ढोपराने मारून धक्काबुक्की केली. या तक्रारीवरून पोलिसांनी वरील चारही आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये अदखलपात्र गुन्हा (रजि. नं. ५०६/२०२६) दाखल केला आहे.
मतदानाच्या दिवशीच गावात दोन गटांत झालेल्या या राड्यामुळे विडणी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
