
कोळकी येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्म उपासिका शिबिरास सुरुवात झाली. महिलांना धम्म, साधना व जीवनपद्धतीचे मार्गदर्शन दिले जात आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ एप्रिल : फलटण तालुक्यातील कोळकी येथे भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म उपासिका शिबिरास सुरुवात झाली. त्रिसरण व पंचशील ग्रहण करून उपस्थितांनी शिबिराची सुरुवात केली असून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सामाजिक सभागृहात आयोजित या शिबिरात बौद्ध धम्मातील वंदना पद्धती, त्रिसरण व पंचशील यांचे मार्गदर्शन करण्यात आले. पाली भाषेतील उच्चारणासह मराठी अर्थ समजावून सांगत सहभागात्मक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले.
पंचांग प्रणामाची पद्धत प्रत्यक्षिकाद्वारे स्पष्ट करत त्यामागील आध्यात्मिक व व्यावहारिक महत्त्वही उलगडण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या शिबिरात केंद्रीय शिक्षिका सुवर्णा ओव्हाळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले यांनी धम्म शिक्षणात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
माजी तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी साधनेतील शिस्त आणि सातत्य यावर भर दिला. संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी महिलांना शंका निरसनासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
कार्यक्रमात रंजना रणवरे यांनी स्वागत करत शिबिराची रूपरेषा स्पष्ट केली. सुजाता गायकवाड, अरुण गायकवाड, राजकुमार रणवरे, भिकू भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात विविध महिला सहभागी झाल्या असून दहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमात धम्म, साधना व बौद्ध जीवनपद्धतीवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिराद्वारे महिलांमध्ये धम्माविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरात या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

