फलटण: वीर धरण १०० टक्के भरले – नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वीर धरण १०० टक्के भरले असून नीरा नदीपात्रात १०,३७४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 24 जुलै : नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील वीर धरण १०० टक्के पूर्ण भरले आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी पहाटे दीड वाजल्यापासून नीरा नदीपात्रात एकूण १०,३७४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नीरा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग

नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीर धरणाच्या सांडव्यावरून ९,२७४ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,१०० क्युसेक असा एकूण १०,३७४ क्युसेक वेगाने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची आवक यानुसार विसर्गामध्ये पुन्हा वाढ किंवा घट होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नीरा प्रणालीतील धरणांची स्थिती

नीरा खोऱ्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत गुंजवणी धरण क्षेत्रात सर्वाधिक १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे धरण ८१.२३ टक्के भरले आहे. याव्यतिरिक्त नीरा देवघर धरण ७६.२२ टक्के (४० मि.मी. पाऊस) आणि भाटघर धरण ७०.४८ टक्के (१६ मि.मी. पाऊस) भरले आहे. नीरा प्रणालीतील चारही प्रमुख धरणांमध्ये मिळून सध्या ३७.९११ टीएमसी म्हणजेच ७८.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!