फलटण-पंढरपूर रेल्वेबाधित शेतकऱ्यांना ‘चौपट’ नुकसान भरपाई द्या! रणजितदादांची बैठकीतून थेट रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी; पंढरपूर येथील उच्चस्तरीय आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, पंढरपूर, दि. १७ सप्टेंबर : ब्रिटिशकालीन फलटण ते पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने आज पंढरपूर येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या हिताचा अत्यंत कळीचा मुद्दा रणजितदादांनी उपस्थित केला. त्यांनी बैठकीतूनच थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत, या बाधित शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या तब्बल चौपट दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

या बैठकीदरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या भावना थेट रेल्वेमंत्र्यांच्या कानावर घातल्या. फलटण ते पंढरपूर हा रेल्वे प्रकल्प ब्रिटिशकालीन असून, या जुन्या मार्गासाठी रेल्वेचे भूसंपादन खूप पूर्वीच झालेले आहे. मात्र, त्याठिकाणी अनेक दशके कोणतीही कार्यवाही न झाल्याने आजच्या काळात तिथे हजारो शेतकऱ्यांची हक्काची घरे आणि उभी पिके आहेत, जी या प्रकल्पामुळे आता बाधित होत आहेत. विकासाला कुणाचाही विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांची घरे आणि सुपीक जमिनी या प्रकल्पात जात आहेत, त्यांना वाऱ्यावर न सोडता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जमिनीच्या चालू बाजारभावापेक्षा ‘चौपट’ दराने नुकसान भरपाई मिळायलाच हवी, अशी ठाम आणि आग्रही भूमिका रणजितदादांनी यावेळी मांडली.

रणजितदादांच्या या दिल्लीतील भक्कम वजनाचा आणि आग्रही मागणीचा तात्काळ प्रभाव दिसून आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी या संवेदनशील विषयावर शासन स्तरावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे भक्कम आश्वासन दूरध्वनीवरून दिले.

या सकारात्मक चर्चेनंतर, बैठकीला उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही प्रशासनाच्या वतीने रणजितदादांना आश्वस्त केले.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या आणि आजच्या बैठकीतील चर्चेच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी शासनाकडे लवकरात लवकर परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी ग्वाही दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीसाठी प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर एकाच छताखाली उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणजितदादांच्या या धडक कार्यवाहीमुळे रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Back to top button
Don`t copy text!