वाठार निंबाळकर: भरधाव कारला भीषण अपघात – तिघांचे निधन

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे भरधाव स्विफ्ट डिझायर कार नाल्यावरील कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचे निधन झाले असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 24 जुलै : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत एका भरधाव कारने नाल्यावरील कठड्याला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात तीन तरुणांचे जागीच निधन झाले असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नयन अमरजित लौंगाणी आणि त्यांचे पाच मित्र वाठार निंबाळकर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून ते त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १६ एटी १७५६) परतत होते. त्यावेळी संशयित मोहम्मद हुसेन हा कार चालवत होता.

संशयित मोहम्मद हुसेन याने गाडी अतिशय वेगाने चालवल्याने वाठार निंबाळकर हद्दीत आल्यावर त्याचा कारवरील ताबा सुटला. भरधाव कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नाल्यावरील कठड्याला जोरदार धडकली आणि बाजूला पलटी झाली. या भीषण अपघातात कार चालक मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेवरम आणि सदानंद पूर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) यांचे गंभीर मार लागल्याने निधन झाले.

या अपघातात गाडीतील नयन लौंगाणी, सौरभ कुमार आणि एम. डी. सितारे हे तीन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!