स्थैर्य, सातारा, दि.२०: गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मध्यरात्री सातार्यात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित बाळकृष्ण झोरे (वय 23, रा. बोगदा परिसर सातारा) याची गाडी लावण्यावरून रमजान शेख ( रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याशी गुरुवारी दुपारी वाद झाला होता. त्यावेळी रमजान शेख, शशिकांत बडेकर, इकबाल शेख, अकबर कंकणी यांनी त्याला मारहाण केली. या वादातूनच गुरुवारी मध्यरात्री रोहितने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार वाहनांची दगडाने तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी वाहन मालकांना याची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाड्यांचा पंचनामा केला. सुमारे 20 ते 25 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या गाड्या फोडल्याचा आरोप असलेला रोहित झोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रोहित झोरे याच्या तक्रारीवरून चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रोहितवर गाड्या फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.