फलटण: सलून चालकाकडे खंडणी मागणारा जेरबंद – पोलिसांचा दणका


फलटणमध्ये सलून चालकाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत खंडणी मागणान्या सराईत संशयिताला शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून शस्त्र व दुचाकी जप्त केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २३ मे : शहरातील जिंती नाका परिसरातील एका सलूनमध्ये घुसून चालकाला लोखंडी हत्याराचा धाक दाखवत दरमहा दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या सराईत संशयिताला फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अभिजित अरुण जाधव (वय २२, रा. मलठण, ता. फलटण) असे या अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

दुकानात घुसून मारहाण व तोडफोड

जिंती नाका येथे आशिष अशोक गाढवे यांचे किंग युनिसेक्स पार्लर नावाचे सलून आहे. १९ मे रोजी सायंकाळी दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून आले. त्यापैकी एकाने दोन फुटांचे लोखंडी हत्यार काढून गाढवे यांना धमकावले. ‘मला अभि भाई म्हणतात, तू मला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे’, अशी धमकी देऊन त्याने गाढवे आणि कामगारांना मारहाण केली.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

या मारहाणीत मोहम्मद फरमान आणि अझीम अहमद हे कामगार जखमी झाले. सोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केली. यानंतर संशयितांनी दुकानातील सामानाची तोडफोड केली. तसेच, बाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने अटक

गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिजित जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपला साथीदार अक्षय जाधव (रा. मलठण, फलटण) याच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयित अभिजित जाधव याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार

संशयित अभिजित जाधव याच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी, मारामारी आणि महिलांविरूद्धचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक निरीक्षक नितीन शिंदे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार संतोष नाळे, जितेंद्र टिके, अतुल बडे, मुकेश घोरपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!