शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । मुंबई । लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे महानायक होते. महाराजांच्या राज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त सुवर्ण आणि रौप्य मुद्रा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि राजभवन, महाराष्ट्र यांच्यावतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,  राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, मुंबई परिक्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा दूरदर्शीपणा,  न्यायप्रियता, सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि त्यांच्यात नवचेतना जागवणारे राजे होते.  स्वतःचे आरमार तयार करून त्यांनी  स्वराज्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रातून विविध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले.  त्यांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच  १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळी विशेष सुवर्ण आणि रौप्य पदक काढण्यात आले होते. आता राज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त  तसे प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.

विशेष टपाल तिकीट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिट अनावरण हे महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन आहे.  महाराजांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक केला. लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श समोर ठेवून राज्य शासन काम करत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध लाभ देत आहोत. रायगडाचे जतन, संवर्धन करतोय. त्यासोबत शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गड किल्ल्याच्या जतनासाठी प्राधान्य देत आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व करणार असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला किल्ले रायगडावर उपस्थित राहता आले हे भाग्य आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, कुशल संघटक, कुशल प्रशासक होते. ते असामान्य युगपुरुष होते.  त्यांच्याबरोबर जीवाला जीव देणारे मावळे होते. त्यामुळे त्यांनी इतिहास घडवला, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

राज्य शासन सातासमुद्रपार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचे काम करीत आहे. येत्या वर्षभरात त्यासाठी विविध कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.  राज्य शासनाने सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर असे केले. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. कष्टकरी, शेतकरी, महिला या घटकांना मदतीची भूमिका राज्य शासनाने  घेतली आहे. राज्यातील २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली त्यामुळे सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे काम राज्य शासन करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचाल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजच्या दिवशी विशेष टपाल तिकिट निघतेय ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. अनेक जण मुघलांचे मांडलिकत्व पत्करून काम करीत असताना त्याकाळी छत्रपतींनी स्वकियांसाठी  स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले.

ते म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यानंतर मराठी माणूस थांबलाच नाही. मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवत ठेवण्याचे काम त्याकाळी झाले. छत्रपतींनी बीजारोपण केलेल्या विचारांमुळे आज देशात महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. आपल्याला शक्ती, ऊर्जा देणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘टॉकिंग बुक’  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जगातील १९३ देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प दिन  या राज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने आपण केला आहे. आमच्या विभागाने वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘टॉकिंग बुक ‘ (Talking book) आपण करत आहोत. देशासह जगाच्या विविध भागात आज राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे, जगदंब तलवार भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, शिवकालीन नाणी संग्राहक प्रवीण मोहिते, इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. यावेळी श्रीमती पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आज प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाची किंमत पाच रुपये इतकी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका वेळी असलेले सुवर्ण चलन होन हे या टपाल तिकिटावर घेण्यात आले आहे.  विशेष म्हणजे केवळ सहा दिवसात ही टपाल तिकिट प्रकाशित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या विशेष टपाल तिकिट अनावरण कार्यक्रमानंतर शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!