
दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण | कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गेले काही वर्ष अनेक कारणांच्यामुळे रखडल्या होत्या. त्यानंतर नुकताच बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आज बाजार समितीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काल पर्यंत फलटण बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या बाजार समितीच्या मेळाव्यात सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटच्या दिवशी म्हणजे आज दि. ३ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे बाजार समितीमध्ये नक्की राजे गट कोणाला संधी देणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांची आकडेमोड केली तर बाजार समितीची सत्ता हि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या ताब्यात राहणार यात कसलीही शंका नाही. किंबहुना तालुक्यातील असणारे विरोधक सुद्धा यामध्ये जास्त रस घेताना दिसून आलेले नाहीत. परंतु सत्ताधारी असणाऱ्या राजे गटामध्येच इच्छुकांची संख्या ढीगभर झाल्याने राजे नक्की कोणाला संधी देणार याचे चित्र आज स्पष्ट होईल.