कोरोना महामारीत आशा स्वयंसेविकांचे कार्य अनमोल – सौ. वेदांतिकाराजे, कोरोना योद्धा म्हणून केला गौरव


स्थैर्य, सातारा, दि. १६ : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. आपल्या देशातही कोरोनाने थैमान घातले असून प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आरोग्य यंत्रणेतील घटक असलेल्या आशा स्वयंसेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मोठे योगदान दिले असून त्यांचे कार्य अनमोल आहे, असे गौरवोद्गार कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.

कोरोना महामारीत आणीबाणीच्या काळात आशा स्वयंसेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन जनजागृती, तपासणी आदी कामे करून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी केला तसेच कोरोना महामारी आटोक्यात येण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. अशा आशा स्वयंसेविकांचा नगरसेवक धंनजय जांभळे मित्रपरिवाराच्या वतीने सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक जांभळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

सर्वजण घरी बंदीस्त असताना सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर होत्या. आरोग्य विभागावर तर खूप मोठा ताण होता आणि आजही आहे. कोरोनामुले उद्भवलेल्या आणीबाणीच्या काळात आशा सेविकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. या सर्व भगिनींचे कार्य खूपच मोठे आहे. नगरसेवक धंनजय जांभळे मित्र परिवाराने अशा कोरोना योध्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. यामुळे या भगिनींना अधिक जोमाने जनसेवा करण्याची प्रेरणा मिळणार आहे. अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वानीच मास्क वापरावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!