फलटण: महिला बदनाम करणाऱ्या दोघांना बेड्या – पोलिसांचा उलगडा


महिलांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून अश्लील फोटो प्रसारित करणाऱ्या दोन संशयित आरोपींना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०६ जून : सोशल मीडियावर महिलांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून त्यांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोन संशयित आरोपींना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

एक महिला गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकारामुळे त्रासाला सामोरी जात होती. संशयिताने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड मिळवून इंस्टाग्रामवर वेगवेगळी बनावट खाती उघडली होती. या खात्यांवरून पीडित महिला आणि तिच्या पतीची बदनामी करणारे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि मेसेज फेसबुक तसेच व्हॉट्सॲपवर पाठवले जात होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.

सीमकार्ड विक्रेत्यालाही अटक

पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि त्यांच्या पथकाने तपास करून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल क्रमांक आणि बनावट इंस्टाग्राम आयडी शोधून काढले. या तपासात प्रमोद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुनील मोहिते (वय ३४, रा. चाठार निंबाळकर, फलटण) याने त्याला दुसऱ्याच्या नावाचे सीमकार्ड चालू करून दिल्याचे निष्पन्न झाले. मोहिते हा एका मोबाईल कंपनीचा सीमकार्ड विक्रेता आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ मोबाईल हँडसेट आणि ६ सीमकार्ड असा एकूण २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे आणि कर्मचारी बापूराव धायगुडे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे, निखिल गायकवाड, गणेश अवघडे, जयदीप यादव व अतुल धडे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!