फलटण: नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये १४ टक्के पाणीसाठा – पावसाची प्रतीक्षा


नीरा उजवा कालवा विभागाने दिलेल्या अहवालानुसार नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांमध्ये १४.०५ टक्के म्हणजेच ६.७९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०६ जून : नीरा उजवा कालवा विभागाच्या ताज्या अहवालानुसार नीरा प्रणालीतील चारही धरणांमध्ये एकूण ६.७९ टीएमसी म्हणजेच १४.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला हा पाणीसाठा १५.५६ टक्के इतका होता. धरणांमधील पाणीपातळी वेगाने खालावल्याने परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

धरणांमधील सद्यस्थिती

नीरा प्रणालीमध्ये भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणांचा समावेश होतो. या चारही धरणांची मिळून एकूण साठवण क्षमता ४८.३३ टीएमसी इतकी आहे. सध्या भाटघर धरणामध्ये १.८७ टीएमसी (७.९६ टक्के) आणि वीर धरणामध्ये २.६३ टीएमसी (२७.९५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच नीरा देवघर धरणामध्ये १.५९ टीएमसी (१३.५५ टक्के) तर गुंजवणी धरणामध्ये ०.७० टीएमसी (१८.९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

वीजनिर्मिती आणि कालवा विसर्ग

सध्या नीरा देवघर धरणामधून वीजनिर्मितीसाठी १२०० क्युसेक्स, तर गुंजवणी धरणामधून १३० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा डावा कालव्यातून ८२७ क्युसेक्स तर नीरा उजवा कालव्यातून १५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत उजव्या कालव्यातून १२.३४ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!