फलटण: कत्तलीसाठी नेणाऱ्या दोन देशी गाईंची सुटका – पोलिसांचा दणका


कुरवली पाटी येथे नाकाबंदी करत फलटण ग्रामीण पोलिसांनी कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन देशी गाईंची सुटका केली. दोन संशयितांना अटक करून वाहन जप्त केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०५ जून : फलटण-पंढरपूर रोडवरील कुरवली पाटी येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन देशी गाईंची सुटका केली. मध्यरात्री केलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एका पथकाला वाहनातून गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरवली पाटी येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित अशोक लेलँड टमटम (एमएच ४५ एएफ २६५३) अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात दोन देशी गाई अत्यंत क्रूरपणे आणि चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

गोशाळेत रवानगी आणि गुन्हा दाखल

वाहनातील संशयितांकडे वाहतूक परवाना किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गाईंची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत दाखल केले. याप्रकरणी प्रकाश रामचंद्र वाघमोडे (रा. ६० फाटा, माळशिरस, जि. सोलापूर) आणि बाळू अंबू सरगर (रा. नातेपुते, ता. माळशिरस) या दोन संशयितांवर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मठपती, पोलीस हवालदार खरात, चांगण आणि ढोले यांनी ही कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!