

स्थैर्य, फलटण, दि. 6 जून : आगामी सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून, संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या नियुक्त्यांचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले असून, यामध्ये फलटणच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
जयकुमार शिंदे व अशोकराव जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी
या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस असणारे फलटणचे सुपुत्र जयकुमार शिंदे यांच्यावर पक्षाने मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची माण-खटाव, फलटण, वाई-खंडाळा-महाबळेश्वर आणि कोरेगाव या चार मोठ्या विधानसभा मतदारसंघांसाठी ‘निरीक्षक’ (Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, फलटण विधानसभा मतदारसंघातील ४१ मतदारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी फलटण नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांची ‘सहप्रभारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर या मतदारसंघाचे ‘प्रभारी’ म्हणून सुनील काटकर कामकाज पाहणार आहेत.
जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांतील नियुक्त्या खालीलप्रमाणे:
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांसाठी खालीलप्रमाणे प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती केली आहे:
-
सातारा (८४ मतदार): विक्रम पावसकर (प्रभारी), विकास गोसावी (सहप्रभारी)
-
कोरेगाव (२९ मतदार): भरत पाटील (प्रभारी), भरत मुढे (सहप्रभारी)
-
कराड उत्तर (३२ मतदार): डॉ. दिलीप येळगावकर (प्रभारी), गणेश जाधव (सहप्रभारी)
-
कराड दक्षिण (६७ मतदार): रामकृष्ण वेताळ (प्रभारी), धनंजय पाटील (सहप्रभारी)
-
पाटण (२८ मतदार): आनंदराव पाटील (प्रभारी), वसंतराव पाटणकर (सहप्रभारी)
-
माण-खटाव (६१ मतदार): निलेश माने (प्रभारी), सोमनाथ भोसले (सहप्रभारी)
-
वाई-खंडाळा-महाबळेश्वर (१२२ मतदार): अरुण गोरे (प्रभारी), अनिरुद्ध गाढवे (सहप्रभारी)
दोन निरीक्षकांच्या नियुक्त्या
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यात दोन निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात जयकुमार शिंदे (माण-खटाव, फलटण, वाई, कोरेगाव) आणि विठ्ठल बलशेटवार (कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा, पाटण) यांचा समावेश आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, संघटनात्मक बांधणीचा आणि निवडणूक कौशल्याचा उपयोग आगामी विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी नक्कीच होईल, असा सार्थ विश्वास सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला आहे.
