दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्रात सोयाबीन हे क्र. २ चे मुख्य नगदी पीक आहे. राज्यात यावर्षी सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी १४.५६ क्विंटल आहे. राज्याचा सरासरी उत्पादन खर्च ६०३९ रु. क्विंटल आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारने ‘सीएसीपी’ (कृषी लागत एवं मूल्य आयोग) कडे प्रती क्विंटल ६९४५/- दर दिला जावा, अशी शिफारस केली आहे. ती रास्त आणि योग्य आहे. यासाठी सर्व शेतकरी चालू हंगामात सोयाबीनला ६९४५/- रु. क्विंटल दर द्यावा, अशी मागणी भारतीय किसान महासंघ महाराष्ट्र सातारा जिल्हा व फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महासंघाने दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटीत प्रयत्नांतून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजारांच्या वर जाऊ दिला नाही. अशा परिस्थितीत जर शेतकर्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी.
निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी, किड रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आहेत. उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस त्याचे सुखाचे जावेत, ही अपेक्षा आहे. आपण लाडक्या बहिणींचा विचार केलात तसा लाडक्या शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करून वरील निर्णय घोषित कराल, अशी आशा आहे, असे किसान महासंघ फलटण तालुक्याच्या वतीने अॅड. संजय कमलाकर कांबळे (सहमंत्री, सातारा जिल्हा, भारतीय किसान संघ) व महादेव कृष्णा गायकवाड (उपाध्यक्ष, फलटण तालुका, भारतीय किसान संघ) यांनी पत्रात म्हटले आहे.