
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यातून फलटण शहर आणि तालुक्यातील 500 ते 1500 स्क्वेअर फुटांपर्यंतची केवळ निवासी अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित केली जाणार आहेत. या संदर्भात फलटणमध्ये प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
स्थैर्य, फलटण, दि. 29 एप्रिल : फलटण शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नांतून फलटण शहर व तालुक्यातील ‘निवासी अतिक्रमणे’ आता कायमस्वरूपी नियमित (Regularize) होणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखील जाधव उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी नगरसेविका सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. अस्मिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्या सौ. किरण नलवडे, ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव, अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, रोहित नागटिळे, संदीप चोरमले, माजी नगरसेवक अनुप शहा, पंचायत समिती सदस्य विकास नाळे, नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सौ. कांचन व्हटकर, सौ. मीना काकडे, नगरसेवक अमित भोईटे आणि राहुल निंबाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :
■ ५०० ते १५०० स्क्वेअर फुटांची अतिक्रमणे नियमित होणार : प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर
प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर यांनी अतिक्रमण पुनर्वसनाच्या नवीन शासन निर्णयाची आणि त्याबाबतच्या समितीची सविस्तर माहिती दिली. या शासन निर्णयानुसार ५०० ते १५०० स्क्वेअर फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित होणार आहेत. शहरासोबतच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे सभापती यांच्या माध्यमातून ही अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
■ नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे शासनास कळवावीत : आमदार सचिन पाटील
आमदार सचिन पाटील यांनी आवाहन केले की, नागरिकांनी आपण स्वतःहून आपले अतिक्रमण शासनास कळवले तर शासन त्यामध्ये नक्कीच मार्ग काढेल. अतिक्रमणांच्या मुळे अनेकदा गावात व शहरात भांडण-तंटे होत असतात, ही अतिक्रमणे नियमित झाल्यास या तंट्यांना आळा बसेल.
■ पालिका कर्मचारी व नगरसेवकांची जबाबदारी वाढवावी : नगराध्यक्ष समशेरसिंह
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील अतिक्रमणांबाबत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, फलटण शहरात झोपडपट्टीमध्ये जी अतिक्रमणे केली आहेत, त्यातील काही अतिक्रमणधारक हे ते अतिक्रमण तसेच सोडून स्वतः फ्लॅटमध्ये राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात काम करताना नगरसेवक व नगरपालिका कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढवून त्यांच्या माध्यमातून काटेकोरपणे कामकाज करावे.
■ निवासी अतिक्रमणेच नियमित होणार : माजी खासदार रणजितसिंह
या बैठकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, ज्या उताऱ्यांवर महाराष्ट्र शासन आणि नगरपालिकेची जागा आहे, तेथील अतिक्रमणे आता नियमित होणार आहेत. यामध्ये वनविभागाच्या जागा वगळून इतर अतिक्रमणे नियमित केली जातील. विशेष म्हणजे ज्या जागेत कोणताही ‘व्यावसायिक वापर’ होत नसलेली जागा आहे आणि ज्यामध्ये फक्त ‘रहिवासी’ (निवासी) वापर होतो, अशीच अतिक्रमणे नियमित होणार आहेत.
■ खाजगी मोजणीदार नेमून मोजणी करावी : माजी खासदार रणजितसिंह
अतिक्रमणे नियमित करण्याच्या या प्रक्रियेत स्थानिक विधानसभा सदस्यांची (आमदारांची) शिफारस लागणार आहे. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने यासाठी खाजगी मोजणीदार घेऊन तातडीने मोजणीचे कामकाज करावे, अशा सूचना रणजितसिंह यांनी दिल्या.
■ आमदारांना विचारात घेऊनच कामकाज करा : माजी खासदार रणजितसिंह
प्रत्येक गावातील अतिक्रमणे नियमित करताना प्रशासनाने विधानसभा सदस्यांना (आमदारांना) विचारात घेऊनच काम करावे. तसेच आमदार साहेब सुद्धा यामध्ये कोणत्याही अतिक्रमणधारकाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतील, असा विश्वास रणजितसिंह यांनी व्यक्त केला.
■ ‘ओपन स्पेस’ नगरपालिकेच्या नावावर करा : माजी खासदार रणजितसिंह
शहरातील जे ‘ओपन स्पेस’ (मोकळ्या जागा) नगरपालिकेच्या नावावर आहेत, त्या अधिकृतरीत्या नगरपालिकेच्या नावावर करण्यात याव्यात. त्याबाबत भूमिअभिलेख विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
■ ‘ओपन स्पेस’बाबत प्रशासनाची कार्यवाही : प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर
रणजितसिंह यांच्या सूचनेला उत्तर देताना प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर यांनी सांगितले की, फलटण शहरात जे ओपन स्पेस आहेत ते नगरपालिकेच्या नावावर विहित नमुन्यात करण्यात येतील. यासाठी महसूल, भूमिअभिलेख व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या काही दिवसांत शहरातील सर्व ओपन स्पेस ह्या नगरपालिकेच्या नावावर करण्यात येणार आहेत.
■ सभापतींचा अवमान खपवून घेणार नाही : माजी खासदार रणजितसिंह
शासकीय कामकाजाबाबत सक्त ताकीद देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, पंचायत समितीच्या सभापतींचा अवमान होत असल्याचे दिसून येत आहे. जर असे प्रकार पुन्हा माझ्या निदर्शनास आले तर त्याचा योग्य तो ‘इलाज’ केला जाईल.
■ सभापतींचे निवासस्थान १५ दिवसांत पूर्ण करा : माजी खासदार रणजितसिंह
फलटण पंचायत समिती सभापती यांचे जे अधिकृत निवासस्थान आहे, त्याचे राहिलेले कामकाज येत्या १५ दिवसांत पूर्ण करावेत. तसेच प्रशासकीय पातळीवर जे जे काही विषय प्रलंबित आहेत, ती कामे तातडीने करून घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना रणजितसिंह यांनी यावेळी दिल्या.

