पालकमंत्र्यांची भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाबाबत पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरेंसोबत सकारात्मक चर्चा


दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । पुणे । भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास श्री.पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री श्री. पाटील हे आग्रही आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले होते. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी महाधिवक्त्यांना केली होती.

त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्त्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!