
शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक व तुळापूर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या विकास आराखड्यात वाढ करण्यात आली असून, ५२९.८७ कोटींच्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २९ : शिरूर तालुक्यातील मौजे तुळापूर (बलिदान स्थळ) व वढू बुद्रुक (समाधी स्थळ) येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या विकास आराखड्यातील वाढीव कामांसह राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी आता एकूण ५२९.८७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
अशी झाली आराखड्यात वाढ
शासन निर्णयान्वये यापूर्वी या स्मारकासाठी २८२.२४ कोटी रुपये किमतीच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. मात्र, मूळ आराखड्यात सुधारणा करताना विविध पायाभूत सुविधा व अतिरिक्त कामांचा नव्याने समावेश करण्यात आला. यामुळे या आराखड्यात आता २४७.६३ कोटी रुपयांची वाढ झाली असून, सुधारित आराखड्याची एकूण किंमत तब्बल ५२९.८७ कोटी रुपये इतकी झाली आहे.
सुधारित आराखड्यातील प्रमुख वाढीव कामे व तरतुदी:
-
रस्ता विकास: आपटी ते वढू बुद्रुक रस्ता विकासासाठी सुमारे ७३ कोटी रुपये, तसेच आपटी ते तुळापूर दरम्यान ‘ग्रीनफिल्ड रस्ता’ विकसित केला जाणार आहे.
-
पूल आणि डेक: भीमा नदीवरील आपटी येथे १८ मीटर रुंदीच्या पुलाचे बांधकाम आणि ४५ कोटी रुपये खर्चून ‘व्ह्यूइंग डेक’ उभारण्यात येणार आहे.
-
भव्य ध्वज: स्मारकाच्या ठिकाणी ३० मीटर उंचीचा भव्य भगवा ध्वज (सांस्कृतिक ध्वज) उभारण्यात येईल.
-
इतर सुविधा: पथदिवे, युटिलिटी शिफ्टिंग तसेच भूसंपादनासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, एकूण सुमारे २३७ कोटी ६३ लाख रुपयांच्या कामांना स्मारकाच्या मुख्य घटकांत मान्यता मिळाली आहे.
मंत्री शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्याला यश
काही दिवसांपूर्वीच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वढू-तुळापूर येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर या ठिकाणी विविध अतिरिक्त कामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.
जून २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
हा संपूर्ण भव्य प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. या स्मारकाच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीला मोठी चालना मिळणार असून, स्थानिकांना ‘गाईड प्रशिक्षण’, गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयी-सुविधा उभारण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.

