
स्थैर्य, नागठाणे, दि.१४: कोरोना साथ रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागठाणे (ता. सातारा) येथील व्यापार्यांकडून दहा दिवसांचा जनता कर्फ्यु घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. मंगळवार (दि. 15) पासून या जनता कर्फ्युला सुरुवात होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने मिशन बिगीन अगेनची घोषणा केल्यानंतर सातारा जिल्ह्यात टप्प्याटप्याने अनलॉकिंग सुरू झाले. महामार्गावरील नागठाणे हे बाजारपेठेचे असल्याने येथेही सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आले होती. नागठाण्यात परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने येथील बाजारपेठ रोजच गजबजत होती. त्यामुळे सोशल डिस्टसिंनचा फज्जा उडाला होता.अनेक लोक विना मास्कचे फिरताना आढळत होते. त्यामुळे नागठाणे गावात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या रोजच वाढत होती.
नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना साथ रोग सुरू झालेपासून 342 रुग्णांची नोंद झाली आहे. नागठाणे गावातच आज अखेर 79 कोरोना बधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे गावात रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी येथील व्यापारी वर्गाने 10 दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद रहाणार आहेत.