
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : फलटणच्या राजकीय वर्तुळात आता संघर्ष शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. “रणजितसिंह हे कायम पोलिसांचा फौजफाटा घेऊन फिरतात, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने फिरून दाखवावे,” या आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे थेट प्रत्युत्तर दिले आहे. पोलिसांचे संरक्षण बाजूला ठेवून रणजितदादा एकटेच गजानन चौकात दाखल झाले, एवढेच नव्हे तर थेट रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर जाऊन त्यांनी विरोधकांना उघडे पाडले.
गजानन चौकात ‘बुलेट’वरून एन्ट्री अन् विरोधकांना थेट आव्हान
पत्रकार परिषदेत दिलेल्या आव्हानानुसार, काल रात्री ठीक ९:३० वाजता रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणताही पोलिसांचा ताफा न घेता ‘बुलेट’वरून एकटेच गजानन चौकात दाखल झाले. ते दाखल होताच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा गराडा घातला, मात्र दादांनी स्वतः कार्यकर्त्यांना दूर राहण्याचे आवाहन केले. यानंतर गजानन चौकात बुलेटवर फेरफटका मारून ते थेट रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर जाऊन काही काळ थांबले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रणजितदादा म्हणाले, “कोणताही पोलिसांचा फौजफाटा न घेता मी एकटा आलेलो आहे. ज्यांनी ज्यांनी मला आव्हान दिले, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी इथे यायला पाहिजे होते. माझ्या पोलिसांच्या प्रोटेक्शनची यांना नक्की काय अडचण आहे, हे आजपर्यंत मला कळलेले नाही.”
मुली-बाळींवरील टीका अक्षम्य; कार्यकर्त्यांना स्वाभिमान नाही का?
तत्पूर्वी, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या वक्तव्यांचा खरमरीत समाचार घेतला. “रामराजेंच्या शिव्यांकडे मी लक्ष देणार नाही, पण साखरवाडीत बोलताना त्यांनी मुली-बाळींवर जी घाणेरडी टीका केली, ती त्यांची चूक अक्षम्य आहे. त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना ‘षंढ’ म्हटले आणि तरीही ते निमूटपणे ऐकून घेतात; त्यांच्या कार्यकर्त्यांनाही काही स्वाभिमान उरलेला नाही,” असा घणाघात दादांनी केला.
रेल्वेसारख्या विकासकामांवरून विरोधक केवळ नकारात्मकता पसरवत असल्याची टीका करत ते पुढे म्हणाले, “माझा स्वराज कारखाना मी स्वतःच्या हिमतीवर काढला असून त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. मी कुणाकडूनही एक रुपया घेतलेला नाही. डेअरी पण आम्ही स्वतःच्या हिमतीवर चालवली. ३० वर्षे अडकून पडलेले नीरा-देवघरचे पाणी आपण हिमतीने पुढे आणले, आणि यातूनच मी माझ्या खासदारकीच्या पराभवाची किंमत मोजली. तालुक्यात भाजपमध्ये आता मोठे प्रवेश होणार आहेत, हे त्यांना समजले असल्याने ते केवळ अफवा उठवत आहेत.”
२२ वर्षे ‘लाल दिवा’ भोगूनही जे जमले नाही, ते दादांनी केले: आ. सचिन पाटील
यावेळी आमदार सचिन पाटील यांनीही कडक शब्दांत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “साखरवाडीच्या कन्येवर केलेली टीका अत्यंत निषेधार्ह आहे. सभापती अत्यंत योग्य पद्धतीने प्रशासन हाताळत आहेत, त्यांच्यावर वापरलेले शब्द निषेधार्ह आहेत. आम्ही सकारात्मक राहून तालुका एका वेगळ्या उंचीवर नेत आहोत, पण विरोधक फक्त नकारात्मकता पसरवत आहेत. आम्ही विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत. २२ वर्षे लाल दिवा भोगून त्यांना जे जमले नाही, ते रणजितदादांनी करून दाखवले, हेच त्यांना बघवत नाहीये.”
ही कोणती संस्कृती? नगराध्यक्षांचा थेट सवाल
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या भाषेवर तीव्र आक्षेप नोंदवला. “एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी सभापती झाली आहे. त्या मुलीच्या विरोधात काढलेले अपशब्द ही कुठली संस्कृती आहे? आम्ही नेहमीच रामराजे यांच्या वयाचा मान ठेवला, पण ते जेव्हा सर्वसामान्य कन्येवर असे बोलले, तेव्हा आम्हाला आज बोलायची वेळ आली आहे. त्यांच्या अशा बोलण्याने फलटण तालुक्याचे नाव खराब होत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
२१५ कोटींचा बोजा श्रीरामच्या माथी: ॲड. नरसिंह निकम
ॲड. नरसिंह निकम यांनी सहकार क्षेत्रातील अपयशाचा पाढा वाचताना सांगितले, “श्रीराम कारखान्याकडे यांनी फक्त एक व्यवसाय म्हणून पाहिले आणि कारखाना खंडाने चालवायला दिला. आज त्यांनी सामान्य कर्मचारी आणि सभासदांच्या डोक्यावर तब्बल २१५ कोटींच्या कर्जाचा बोजा लादून ठेवला आहे.”
या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, रणजितसिंह भोसले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.