स्थानिक गुन्हे शाखेकडून नऊ गंभीर गुन्हे उघडकीस; काळजच्या सराईत गुन्हेगारास अटक

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जबरी चोरी, पाच घरफोडी आणि दोन चोरी असे एकूण नऊ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत नऊ तोळे सहा ग्रॅम ८४० मिली वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व हत्यार असा १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील सराईत संशयित चाँद ऊर्फ सूरज जालिंदर पवार (रा. काळज, ता. फलटण) याला अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार घोडके यांनी पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या आधिपत्याखाली विशेष पथक तयार केले होते.

शिरवळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चाँद व त्याचे साथीदार सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यादरम्यान एलसीबीचे पोलिस निरीक्षक घोडके यांना बातमीदारामार्फत चाँद पवार हा साथीदारांसह मानेवाडी गावच्या हद्दीतील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथक त्याच्या मागावर गेले. पोलिसांची चाहूल लागताच चाँद पवार पळून जाऊ लागला. मात्र, पथकाने पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीमध्ये त्याच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती मिळाली. चाँदकडे कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याने विविध ठिकाणी चोरी व घरफोडी केल्याची माहिती दिली. त्यातून शिरवळ, वडूज, फलटण ग्रामीण, खंडाळा, लोणंद आणि बारामती शहर पोलिस ठाण्यांतील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये दोन जबरी चोरी, पाच घरफोडी, एक चोरी आणि एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सोनारांचाही तपास सुरू आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव, रोहित फार्णे, उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सहायक फौजदार राजू मुलाणी, हवालदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, जयवंत खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, अमित झेंडे, प्रमोद सावंत, हणमंत भोसले, नवनाथ कदम, राजू कांबळे, मनोज जाधव, अमित माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्नील दौंड, महेश निर्मळ, इरफान मुलाणी, संकेत निकम, शकुंतला सणस, अधिका वीर, निकिता जाधव, तसेच चालक अमृत करपे, विजय निकम व आनंदा भोये हे या कारवाईत सहभागी होते.

Back to top button
Don`t copy text!