
फलटणमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतूस व दुचाकी जप्त करण्यात आली.
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : फलटण शहरात विना नंबरच्या दुचाकीवरून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन संशयितांना फलटण शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि दुचाकी असा सुमारे एक लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्टेट बँक शाखेजवळ रचला सापळा
शहरात विना नंबरच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून दोघे जण पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ सापळा रचला. संशयित दुचाकी येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पाठीमागे बसलेल्या तरुणाच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले.
साखरवाडीतील दोघांना अटक
या कारवाईत पोलिसांनी जय दयानंद मागडे आणि प्रदीप संतोष गोरे (दोघे रा. साखरवाडी, ता. फलटण) या दोन संशयितांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक मितू जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. शिंदे आणि डीबी पथकाने ही धडक कारवाई केली.
