गुन्हेगारांना दणका : मुलीची छेड काढणार्‍याला हजर नसताना ठोठावली शिक्षा

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातारा न्यायालयात बुधवारी एकाला दहा वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हजर नसतानाही त्याला शिक्षा ठोठावण्यात आल्याने गुन्हेगारांना चांगला दणका बसला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा न्यायालयातील ही पहिलीच अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

अमर गोविंद शेजवळ (वय २१, रा. सुळेवाडी, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. त्याला सहा महिने सक्त कारावास व ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कारावासाची शिक्षा दिली आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. पी. पोंक्षे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

दि. २४ जुलै २०१६ रोजी सकाळी रहिमतपूर परिसरात दोघांनी अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. अमर शेजवळ याने ‘मला तू लय आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणत विनयभंग केला. तसेच मुलीला मोबाईलवर वारंवार फोन करूनही त्रास दिला. अमरच्या साथीदाराने त्याला सहकार्य केले होते. यामुळे दोघांविरुध्द रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन सपोनि श्रीगणेश कानुगडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मंजुषा तळवलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा दिली.

या खटल्यादरम्यान दुसर्‍या संशयिताचा मृत्यू झाला आहे. तसेच अमर शेजवळ हादेखील गेली दोन वर्षे पसार झाला आहे. मात्र, बीएनएस या नवीन कायद्यामुळे आरोपी फरार असतानादेखील या खटल्याचे कामकाज चालवण्यात आले. दोषसिध्दी झाल्याने आरोपीच्या गैरहजेरीत शिक्षा सुनावणी करण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस विनोद मोरे यांनी कामकाज पाहिले.

Back to top button
Don`t copy text!