कास पठारावर फुलांच्या हंगामाला १ सप्टेंबरपासून सुरुवात; प्रवेशासाठी १५० रुपये शुल्क

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२६ | सातारा |
जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविलेल्या जिल्ह्यातील कास पुष्प पठारावर फुलांच्या हंगामाला १ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. विविध रंगांची, प्रजातींची रानफुले बहरण्यास सुरुवात झाल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना मनोहारी सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

सप्टेंबरपासून दिवाळीपर्यंत विविध प्रकारची रानफुले बहरतात. फुलणार्‍या दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींमुळे कासला देश-विदेशांतील पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. फुलोत्सवासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी व्यापक नियोजन केले आहे.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू होणार आहे.

घाटाई फाटा-कासाणी-घाटाई देवी मंदिर मार्गे वाहने कास तलावाकडे जातील आणि कास पठारावरून सातार्‍याच्या दिशेने परततील. कास तलावाकडे न जाणार्‍या वाहनांसाठी कासाणी पार्किंगमधून सातार्‍याकडे परतीची व्यवस्था होईल. राजमार्ग परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केला जाणार आहे.

बैठकीस उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, गुन्हे शाखेचे विश्वजित घोडके, पोलिस निरीक्षक निलेश तांबे, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

प्रवेशासाठी १५० रुपये शुल्क
वनविभागाच्यावतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पध्दतीने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिव्यक्ती १५० रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले जाईल. ऑनलाईन प्रवेश पासांची मर्यादा ३ हजार इतकी असेल. ऑफलाईन वनसमितीतर्फे शुल्क आकारुन प्रवेश दिला जाणार आहे.

Back to top button
Don`t copy text!