श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी पालकमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । अमरावती । माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पालखीचे महाराष्ट्राच्या वारी परंपरेत मानाचे स्थान आहे. ४२७ वर्षांची ही प्राचीन परंपरा जपण्यासाठी कौंडण्यपूरला राज्यात साकार होत असलेल्या पालखी मार्गाशी जोडण्यात यावे, अशी विनंती महिला व बाल विकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांची भेट घेऊन हे निवेदन दिले व विविध विषयांवर चर्चा केली.

महाराष्ट्र राज्यात साकार होत असलेल्या पंढरपूर पालखी मार्गाला अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला जोडून ४२७ वर्षांची परंपरा पुढे चालविण्यासाठी पालखी मार्ग उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी देशाचे भूपृष्ठ व रस्ते वाहतूकमंत्री श्री. गडकरी यांना पालकमंत्र्यांनी केली.

केंद्रपुरस्कृत पालखी मार्ग योजनेअंतर्गत शेगाव अकोला मेडशी अंबेजोगाई परळी मंगळवेढा पंढरपूर मार्ग प्रस्तावित आहे. काही ठिकाणी कामांनाही सुरुवात झाली आहे. अमरावती शहरापासून कौंडण्यपूर ४० किलोमीटरवर आहे. कौंडण्यपूर

पालखी मार्गाला जोडल्यास या प्राचीन पालखी परंपरेसाठी अत्याधुनिक मार्गाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.


Back to top button
Don`t copy text!