

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गुरुवार, १४ मे रोजी पुणे ते पंढरपूर या पालखी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते फलटण येथील नीरा कालवा पुलाची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधतील.
स्थैर्य, फलटण, दि. 12 मे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी हे गुरुवार, दि. १४ मे रोजी बहुचर्चित संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत आहेत. पुणे ते पंढरपूर असा त्यांचा हा रस्ते पाहणी दौरा असणार असून, या प्रवासात ते फलटण येथेही थांबणार आहेत. या दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
फलटणमध्ये नीरा कालवा पुलाची पाहणी आणि पत्रकार परिषद:
ना. गडकरी यांच्या नियोजित दौऱ्यानुसार, ते सकाळी ११ वाजता जेजुरीहून फलटणमध्ये दाखल होतील. सकाळी ११ ते १२ या वेळेत ते फलटण येथील नीरा कालव्यावरील पुलाची (UHPFRC) पाहणी करतील. पाहणीनंतर ते याच ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे, या दौऱ्याचे कव्हरेज करण्यासाठी पुणे ते फलटण दरम्यान तब्बल ७० पत्रकारांचा ताफा दोन स्वतंत्र बसेसमधून त्यांच्यासोबत प्रवास करणार आहे.
असा असेल ना. नितीन गडकरी यांचा संपूर्ण दौरा:
-
सकाळी ८:३० ते १०:०० : पुण्याच्या जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमधून प्रवासास सुरुवात. हडपसरमार्गे दिवे घाटातील रस्ते कामाची पाहणी.
-
सकाळी १०:०० ते ११:०० : जेजुरीहून फलटणकडे प्रयाण.
-
सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० : फलटण येथे नीरा कालवा पुलाची पाहणी आणि पत्रकारांशी संवाद.
-
दुपारी १२:०० ते ०१:४० : फलटणहून नातेपुते, वेळापूरमार्गे वाखरीकडे प्रवास. प्रवासादरम्यान वेळापूर (घुलेनगर) येथील अहिल्यादेवी विहीर आणि वाखरी येथील बाजीराव विहीर येथे थांबून पाहणी.
-
दुपारी ०२:०० ते ०२:३० : पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन.
-
दुपारी ०२:४० ते ०४:३० : माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी राखीव वेळ आणि भोजन.
-
दुपारी ०४:४० ते सायंकाळी ०५:१० : पंढरपूर हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने अक्कलकोट (जि. सोलापूर) कडे प्रयाण.
-
सायंकाळी ०५:१५ ते ०६:१५ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि शिवपुरीचे दर्शन; त्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
-
सायंकाळी ०६:३० ते ०७:३० : अक्कलकोट बसस्थानकाजवळ सोलापूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग (NH) प्रकल्पांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा.
-
रात्री ०८:०० : अक्कलकोटहून सोलापूरला प्रयाण आणि हॉटेल बालाजी सरोवर येथे रात्रीचा मुक्काम.
या अतिमहत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, पालखी महामार्गाच्या कामाला यामुळे आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.