लोणंदजवळ रेल्वे उड्डाणपुलावर एसटी बस – मोटारसायकलची भीषण धडक; अपघातात पिंपरे खुर्दचे तीन युवक जागीच ठार


दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२३ | फलटण |
लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलावर एसटी व मोटरसायकलच्या धडकेत मोटरसायकलवरील तीन युवक जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खुर्द, तालुका पुरंदर, जि. पुणे येथील आहेत.

या अपघाताची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एम एच २० बी एल ४१५८) व निरेकडून लोणंद निघालेली मोटरसायकल (क्रमांक एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये मोटरसायकलवरील अनिल नामदेव थोपटे -गायकवाड (वय २५), पोपट अर्जुन थोपटे-गायकवाड (वय २३) व ओंकार संजय थोपटे – गायकवाड (वय २२, सर्व रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) हे तीनही युवक जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व त्यांच्या सहकार्‍यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला करून सर्व मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.

या अपघाताची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत होती.


Back to top button
Don`t copy text!