दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
दक्षिण भारतातील ‘वृंदावन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरवी (ता. फलटण) येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे प्रायोजकत्व मिळाल्याची माहिती या मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी जयंतराव देशपांडे यांनी दिली.
गिरवीतील गोपाळकृष्ण मंदिराची कीर्ती जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र दूरवर पसरली आहे. जीर्णोध्दार झाल्यानंतर या दिव्यस्थानी महाराष्ट्र आणि दुसर्या प्रांतातील साधक दर्शनासाठी येत आहेत. मंदिरात भक्ती मार्ग प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सतत प्रयत्न आणि उपक्रम आयोजित केले जातात. या मंदिरात केलेली प्रार्थना याची प्रचिती सातत्याने येत असल्याने देश-विदेशातील साधक येथे येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी मंदिर व्यवस्थापनास कळवले सुद्धा आहे. वैदिक अनुष्ठाने सतत आयोजित केली जातात व याप्रसंगी राष्ट्रकल्याण संकल्प केला जातो. ज्येष्ठ सत्पुरुष परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ तसेच परमपूज्य गोविंद देवगिरी स्वामीजी यांनी कौतुक केले आहे. मंदिराच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य घडत आहे.
देशातील अग्रगण्य सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेद्वारे गेली ४० वर्षे मंदिर ट्रस्ट बँकिंग व्यवहार करते. यांनी या कार्याची नोंद घेऊन ट्रस्टला प्रायोजकत्व दिले आहे. अलीकडेच २१ ब्रह्मवृंदांकडून वैदिक अनुष्ठान व कृष्ण चरित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा व सोलापूर येथून अनेक साधक गिरवी येथे कार्यक्रमास उपस्थित होते. एम.आय.टी. पुण्याचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे हेही उपस्थित होते. मंदिराच्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मंदिराची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळे साधकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.