
दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । मुंबई । यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पाटण शाखेच्या व्यवस्थापकांनी १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवहाराची सादर केलेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती यामध्ये तफावत आढळल्याने बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाटण शाखेला भेट देऊन अहवाल बॅंकेला सादर केला. या शाखेत अनियमितता आढळल्याचे अहवालात निदर्शनास आल्याने बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांची बदली करण्यात आली तर जिल्हापरिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून संबंधित शाखा व्यवस्थापकाला बॅंकेने निलंबित केले आहे, असे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.