ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला २४ तासात मंजूर केला अतिरिक्त वीजजोडभार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सक्रिय पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या कारखान्यात रोज १० ते १५ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून मागितल्यानंतर अवघ्या २४ तासात तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची विक्रमी कामगिरी डॉ.राऊत यांच्या सक्रिय देखरेखीखाली पूर्ण झाली आहे!

वर्षानुवर्षे लोखंडासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या उद्योगाने साताऱ्यासह महाराष्ट्राला प्राणवायूची संजीवनी देण्यासाठी ‘ऑक्सीजन’ निर्मितीला सुरवात केली आहे. गेले काही महिने हा उद्योग अडचणीत असल्याने त्याने आपला विजेचा जोडभार कमी केला होता. मात्र आज राज्याला ‘ऑक्सिजन’ची नितांत गरज असल्याने ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी उद्योगांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन करून त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘सोना अलॉयजने त्यांच्या कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त किमान १५ टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी दाखविली. यासाठी ८०० केव्हिएचा भार वाढवून मागितला.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून हा विषय समोर येताच डॉ.राऊत यांनी यास तात्काळ मंजुरी दिली. ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना तात्काळ मदत करण्याच्या व त्यांची प्रक्रिया विनाविलंब करण्याच्या सक्त सूचना ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यापूर्वीच घेतलेल्या बैठकांमध्ये दिल्या आहेत.

लोणंद स्थित ‘सोना अलॉयज’ हा लोखंड निर्मितीमधील प्रसिद्ध असा उद्योग आहे. त्यासाठी या कंपनीकडे सुरुवातीला तब्बल 16000 केव्हीए इतका अतिउच्च जोडभार होता. कालांतराने या कंपनीने आपला जोडभार 3400 व त्यावरुन 700 केव्हीए इतका कमी केला. मात्र आज कोरोना महामारीने हैराण झालेल्या महाराष्ट्राला ‘ऑक्सिजन’ची तातडीने गरज आहे. नवीन प्रकल्प सुरु करण्यास लागणारा कालावधी पाहता आहे त्या उद्योगाला संजीवनी दिली तर तातडीने ऑक्सिजन निर्मिती शक्य होईल. या हेतूने सोना ऍलोयजने साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून गुरुवारी महावितरणचे साताराचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड व बारामतीचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र सदर ग्राहक हा 220 केव्ही वाहिनीवर असल्याने मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारित होता.

या विषयाची तात्काळ दखल घेत ऑक्सिजनची निकड पाहता सोना अलॉयजला 800 केव्हीए इतका जोडभार आहे त्या स्थितीत मंजूर करुन वीज जोडभार जोडून देण्याचे निर्देश  ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी दिल्या. त्यानंतर महावितरणने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला व या उद्योगाला एकप्रकारे ऑक्सिजनरुपी संजीवनीच मिळाली आहे. उद्या शनिवारपासूनच या ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होत आहे.

२४ तासांत अतिरिक्त जोडभार मिळाला – डॉ.नितीन राऊत 

“जिल्हाधिकारी व महावितरण वरिष्ठ प्रशासन यांचे प्रयत्नांतून २४ तासांमध्ये अतिरिक्त ८०० केव्हीए इतका जोडभार जोडून मिळाला. ऑक्सिजनची गरज पाहता प्रकल्पाची तातडीने चाचणी घेऊन उत्पादन सुरू करत आहोत”


Back to top button
Don`t copy text!