

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या बारावीच्या (HSC) परीक्षेत फलटण तालुक्याचा निकाल ८९.९० टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण २४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २ मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (पुणे बोर्ड) वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. या निकालात फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून, फलटण तालुक्याचा एकूण निकाल ८९.९० टक्के इतका लागला आहे.
मंडळाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार (Fresh Regular Candidates), फलटण तालुक्यातून यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण २,७८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष २,७४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते (Appeared). यापैकी एकूण २,४६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केले आहे.
श्रेणीनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे:
1. विशेष प्रावीण्य (Distinction): ७५ विद्यार्थी
2. प्रथम श्रेणी (Grade I): ४९४ विद्यार्थी
3. द्वितीय श्रेणी (Grade II): १,४६० विद्यार्थी
4. उत्तीर्ण श्रेणी (Pass Grade): ४३८ विद्यार्थी
अशा प्रकारे सर्व श्रेणी मिळून फलटण तालुक्यातील एकूण २,४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्याची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.९०% इतकी राहिली आहे. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ट लागल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
