इतिहासाची तोडफोड व पर्यावरणाचा ऱ्हास चिंताजनक; ३८ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये साहित्यिकांनी व्यक्त केली खंत


साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन आणि वन विभाग फलटण यांच्या वतीने आयोजित ३८ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये इतिहासाची तोडफोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासावर साहित्यिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली. याप्रसंगी ‘युवा स्पंदन’ स्मरणिका आणि ‘प्रभाव’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 3 मे : महाराष्ट्र ही थोर संतांची, विचारवंतांची, बुद्धिवाद्यांची तसेच देशाला दिशा व गती देणाऱ्यांची भूमी आहे. या भूमीने अनेक चढ-उतार पाहिले. परंतु अलीकडच्या काळात राज्यकर्त्यांमुळे विचारांचे नको ते संस्करण होत असून, इतिहासाची तोडफोड व पर्यावरणाचा ऱ्हास या दोन बाबींनी आज गंभीर रूप धारण केले आहे, अशी खंत साहित्यिकांनी व्यक्त केली. साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, फलटण व वन विभाग, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३८ व्या ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

इतिहास आणि पर्यावरणाविषयी चिंता:

यावेळी साहित्यिकांनी आपले परखड विचार मांडताना सांगितले की, थोर युगपुरुषांचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सर्वसामान्यांच्या हितासाठी महापुरुषांनी जे कार्य केले आहे, तो पुढील पिढीसाठी अमूल्य ठेवा आहे. सखोल अभ्यास केल्याशिवाय इतिहास सांगणे हे बुवा-बाबांचे काम नाही, त्यामुळे आपण काय बोलतोय याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. तसेच, सध्या दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल (वृक्षांना फासावर लटकवले जात आहे) होत असून वाढत्या तापमानामुळे या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

साहित्यिक संवादाचा पुढाकार:

इतिहासाचे जतन व पर्यावरण संरक्षणासाठी फलटणच्या ‘साहित्यिक संवादा’च्या वतीने यापुढे प्रभावी पावले उचलण्यात येतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. इतिहासाची तोडफोड, थोर युगपुरुषांचा अवमान व वृक्षतोड थांबवण्यासाठी साहित्यिक संवादाच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल आणि समाज परिवर्तनाच्या लाटेत या गैरप्रकारांचा सर्व स्तरांतून विचार होणे गरजेचे आहे, यावर सर्वांचे एकमत झाले.

पुस्तकांचे व स्मरणिकेचे प्रकाशन:

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे संपादित व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनच्या ‘युवा स्पंदन’ या स्मरणिकेचे, तसेच प्रा. विक्रम आपटे लिखित ‘प्रभाव’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती व नवविचारांचे मंथन:

या साहित्यिक संवादात प्राचार्य रवींद्र येवले, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, पर्यावरण प्रेमी सुधीर इंगळे, सचिन जाधव, महादेवराव गुंजवटे, विकास शिंदे, प्रमोद सस्ते, ॲड. रोहिणी भंडलकर, श्रेयस कांबळे, अतुल चव्हाण आणि अविनाश चव्हाण यांनी आपली स्पष्ट मते मांडत नवविचारांचे मंथन घडवून आणले.

या कार्यक्रमास प्रा. विक्रम आपटे, विनायकराव ननावरे, शुभम रणदिवे, विक्रम भांडवलकर, आप्पा तांबे, सविता तांबे, योगेश गंगतीरे, मयूर शेरखाने, गणेश गुळवे, राजकुमार काकडे, अमोल जाधव, सचिन भांडवलकर यांच्यासह फलटण तालुक्यातील अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!