
फलटण येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती व डायमंड सर्च परीक्षेतील यशाबद्दल संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ जुलै : फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि डायमंड सर्च परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेत अर्णव बनकरची बाजी
महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतील अर्णव किरण बनकर याने ३०० पैकी २५६ गुण मिळवले आहेत. या उत्तम गुणांसह त्याने सातारा जिल्ह्यात ४१ वा क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात मोठी भर घातली आहे.
इस्रो अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी विद्यार्थिनींची निवड
शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणारी परिणीती प्रतीक भोसले आणि इयत्ता चौथीत शिकणारी स्वरा अजय पाटील या दोघींनी डायमंड सर्च परीक्षेत विशेष यश मिळवले आहे. या यशाच्या जोरावर या दोन्ही विद्यार्थिनींची बंगळुरू येथील इस्रो (ISRO) अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड झाली आहे.
शिक्षक आणि पालकांचे कौतुक
या लक्षवेधी यशाबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि मुख्याध्यापिका वैशाली जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच, विद्यार्थ्यांकडून करवून घेतलेल्या या उत्कृष्ट तयारीबद्दल व कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका वैशाली जाधव यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
