
फलटण पंचायत समितीच्या मासिक सभेत वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या विभागांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा ठराव करण्यात आला.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ जुलै : पंचायत समिती फलटणची मासिक सभा सभापती शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत वारंवार सूचना देऊनही काही विभाग बैठकीला गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सभागृहामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित विभागांना रीतसर गैरहजेरीबद्दल पत्रव्यवहार करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
खामगाव दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली
सभेच्या सुरुवातीलाच खामगाव येथील दुर्दैवी विजेच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर तालुक्याचे नूतन गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांची ही पहिलीच मासिक सभा असल्याने पंचायत समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करून अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच सभेमध्ये तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
‘उद्यान पंडित’ मुळीक दांपत्याचा बहुमान
विविध प्रकारच्या फलपीक लागवडीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सासकल येथील बबन रामचंद्र मुळीक यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उद्यान पंडित २०२४’ पुरस्कार मिळाला आहे. या यशाबद्दल पंचायत समिती सभेमध्ये मुळीक दांपत्याचा विशेष सत्कार करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यासोबतच आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेऊन प्रशासनास वारकरी सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ही मासिक सभा उपसभापती अमोल सस्ते, गटविकास अधिकारी अक्षय घावटे, सहायक गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले, पंचायत समिती सदस्य आणि सचिव यांच्या उपस्थितीत पार पडली.
