सातारा पालिकेत ठेकेदाराला मारहाण; नगरसेवकाच्या भावानेच चापटले

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातारा पालिकेत सदरबझारमधील एका ठेकेदाराला लेखा विभागातील बिल काढण्यावरून झालेल्या शिवीगाळ प्रकरणी एका नगरसेवकाच्या भावाने बांधकाम विभागाजवळ बोलावून ठेकेदाराला चापटले. या घटनेने नगरपालिकेत काही काळ खळबळ उडाली होती.

सातारा पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी सगळंच आलबेल आहे, असं नाही. सत्ताधार्‍यांमध्येच धुसफूस सुरू असताना नगरसेवकाच्या भावानेच ठेकेदाराला चापटल्याने सगळेच अवाक् झाले आहेत.

सोमवारी दिवसभर कार्यालयीन कामकाज कामकाज सुरू होते. पदाधिकार्‍यांच्या दालनामध्ये नगरसेवक, ठेकेदार व नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नगरपालिकेत नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती. सायंकाळी लोकांची गजबज कमी होत असतानाच लेखा विभागात बिल काढण्यावरून हंगामा सुरू होता. प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचल्याने त्याठिकाणी असलेल्या एका नगरसेवकाच्या भावाला राहावले नाही. तू शिवीगाळ करू नको, असे समजावून सांगितले. मात्र, संबंधित ठेकेदार ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. यानंतर संबंधित नगरसेवकाच्या भावाने त्या ठेकेदाराला बांधकाम विभागाजवळ बोलावत चापटले.

या हाणामारीमुळे नगरपलिकेत एकच गोंधळ उडाला. आरडाओरड्यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. या राड्यानंतर काहीजणांनी मध्यस्थी करून ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. या राड्याची माहिती मिळताच बर्‍याचजणांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागात धाव घेतली. बघ्यांनी तोबा गर्दी केली होती. बांधकाम विभागापासून नगरपालिकेचे जुने प्रवेशद्वार परिसर गर्दीने फुलून गेला होता. नेमके काय झाले, याची विचारपूस प्रत्येकजण करत होता.

सातारा पालिकेत कार्यालयीन शिस्त राहिली नसल्याचे अनेक प्रकारांतून समोर आले आहे. नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांनी ठेकेदार व काही लोक लाडावून ठेवल्याने ती कुणालाही जुमानत नाहीत. काही पदाधिकार्‍यांच्या दालनात काहीजण बिनकामाचे बसलेले असतात. हे प्रकार तातडीने बंद करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Back to top button
Don`t copy text!