
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुधोजी महाविद्यालयात विशेष व्याख्यान झाले. त्यांच्या वक्तृत्व, विचार आणि व्यक्तिमत्त्वाचा डॉ. राजकुमार कदम यांनी वेध घेतला.
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट : प्राचार्य शिवाजीराव भोसले हे केवळ विख्यात वक्ते आणि विचारवंत नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतत्वही होते. त्यांनी पाच दशके मराठी मनावर आपल्या विचारांचा संस्कार केला, असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठान, बारामतीचे प्रा. डॉ. राजकुमार कदम यांनी केले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मुधोजी महाविद्यालयात ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले – एक युगपुरुष’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
‘फलटण वक्तृत्वाची पंढरी, प्राचार्य त्या पंढरीचे पांडुरंग’
महाविद्यालयाच्या IQAC अंतर्गत प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी आणि तिन्ही भाषा वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम होते.
प्रा. डॉ. राजकुमार कदम म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वागण्यात आणि बोलण्यात एकरूपता होती. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. फलटण ही वक्तृत्वाची पंढरी आणि त्या पंढरीतील पांडुरंग म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले, अशी त्यांची ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली होती.
फलटण आणि पुण्यातील वसंत व्याख्यानमालेपासून कॅलिफोर्निया व शिकागोपर्यंत त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या वाणीला करुणेचा स्पर्श होता. या अर्थाने प्राचार्य शिवाजीराव भोसले हे युगपुरुष होते, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांनी त्यांना दीपस्तंभ मानावे’
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या मुधोजी महाविद्यालयातील कार्याचा आढावा घेतला. भोसले यांनी या महाविद्यालयाचे २५ वर्षे प्राचार्यपद सांभाळले. नीती, चारित्र्य आणि अभ्यासाची जोड असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांनी सांगितले.
मोठे कार्यक्रम आणि महाविद्यालयीन संमेलने ते पोलिस यंत्रणेच्या मदतीशिवाय शिस्तीत हाताळत असत आणि विद्यार्थ्यांकडूनही त्यांना प्रतिसाद मिळत असे. अर्धशतकभर मराठी मनावर संस्कार करणे ही साधी गोष्ट नव्हती. विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येकाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जीवनातील दीपस्तंभ मानून वाटचाल केल्यास व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा मिळेल, असे प्रा. डॉ. कदम यांनी नमूद केले.
प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रा. डॉ. प्रभाकर पवार, प्रा. डॉ. संजय दीक्षित, प्रा. डॉ. नितीन धवडे आणि प्रा. डॉ. हणमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. संजय दीक्षित यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रबोधिनीचे चेअरमन प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी आभार मानले. डॉ. सीता जगताप आणि प्रा. शैला क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.
