श्रीराम कारखाना बंद पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचेच प्रयत्न : राजू शेट्टी 

देशात २३ हजार कोटींचा साखर घोटाळा

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२६ | फलटण |
महाराष्ट्रात दोन नंबरला स्थापन झालेला श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. मुख्यमंत्रीच हा कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याने नक्की त्यांचे धोरण काय आहे? सहकारी कारखाने चालवायचे आहेत की बंद पाडून खासगी कारखान्यांची सोय करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रीरामबाबतची भूमिका स्पष्ट करावी,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

फलटण येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, देशात साखरेची किंमत वाढली आहे. हा २३ हजार कोटींचा साखर घोटाळा असून सरकारने जाहीर केलेल्या आकड्यातच तफावत आहे. उत्पादन झालेली साखर आणि शिल्लक साखर यामध्ये तफावत असून शासनाने व्यापार्‍यांना साठेबाजी करण्यासाठी मोकळीक दिली आहे. यामुळे साखरेचे दर वाढले असून साठेबाजीमुळे हे दर वाढले आहेत.

फलटणच्या श्रीराम सहकारी कारखान्याबाबत राजू शेट्टी म्हणाले, श्रीराम कारखाना सुरू झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करतील आणि कारखाना सुरू करण्यासाठी त्यांना भाग पाडतील. यासाठी शेतकर्‍यांचे सभासदांचे जनआंदोलन आम्ही उभारू.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमरसिंह कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ता प्रमोद गाडे, शहराध्यक्ष विक्रम पवार, किरण भोसले, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, संघटक बाळासाहेब शिपुकले, दादासाहेब शेडगे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!