अदानींच्या मुद्द्यावरुन शिंदे-गांधी भिडले, केंद्रीयमंत्र्यांचे राहुल गांधींना ३ प्रश्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्योगपती गौतम अदानींवरुन केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी २० हजार कोटी रुपयांचा प्रश्न विचारत मोदी सरकारला लक्ष्य केले. आता, राहुल गांधी यांनी वर्ड पझलमधून अदानींच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये काही लोकांची नावे-आडनावे जोडून ते २० हजार कोटी रुपये कोणाचे असा प्रश्न पुन्हा विचारला आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे. यावर, आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. तसेच, त्यांनी राहुल गांधींनाच ३ प्रश्नांची उत्तरे विचारली आहे.

राहुल गांधी यांनी आज एक शब्द कोड्याचा फोटो पोस्ट केला. त्यात अदानी असे मोठ्या अक्षरात आहे. परंतू, त्यानंतर जी नावे त्यांनी जोडली आहेत, त्यावरून हे लोक माजी काँग्रेसी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हे लोक आता भाजपात गेले आहेत. या लोकांनी राहुल यांची साथ सोडली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असल्याचेही अंदाज लावले जात आहेत. कारण, या एका नावात शिंदे म्हणजे Scindia हेही नाव येतं. त्यावरुन, आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

आता हे स्पष्ट झालंय की, तुम्ही फक्त एका ट्रोलपर्यंत मर्यादीत राहिला आहात. माझ्यावर निराधार आरोप लावणे आणि इतर मुद्द्यांवरुन लोकांचे ध्यान भटकविण्यापेक्षा माझ्या या ३ प्रश्नांची उत्तरे द्या, असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी राहुल गांधींना तीन प्रश्न केले आहेत. ते खालीलप्रमाणे:

१. मागासवर्गीयांचा अपमान केल्याच्या विधानाबद्दल आपण माफी का मागत नाहीत? याउलट सावरकर यांचा अपमान करता, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करता

२. ज्या न्यायलयाकडे काँग्रेसने सातत्याने बोट दाखवले, आज आपल्या स्वार्थासाठी त्यांवर दबाव का टाकत आहात?

३. तुमच्यासाठी नियम वेगळे का असावेत? तुम्ही स्वत:ला फर्स्ट क्लास व्यक्ती समजता का?

राहुलजी, तुम्ही अहंकारात एवढे आहात की, या तीन प्रश्नांचे महत्त्वही तुम्हाला लक्षात येणार नाही, असे म्हणत मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.


Back to top button
Don`t copy text!