वाढदिनी शरद पवार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून साधणार जनतेशी संवाद


 

स्थैर्य, सातारा, दि.१० : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 12) व्हर्च्युअल रॅली, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. त्यासाठी सातारा जिल्हा बॅंकेच्या सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत कार्यकमाचे नियोजन केले आहे. यामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली. 

श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी श्री. माने यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते. श्री. माने म्हणाले,”” यशवंराव चव्हाण प्रतिष्ठानमधून वाढदिवसानिमित्त खासदार शरद पवार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून समाज माध्यमांव्दारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात सोय करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता श्री. पवार यांच्यावरील शॉर्टफिल्म दाखविली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील नेतेमंडळी आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री. पवार जनतेशी संवाद साधतील.”

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी 13 डिसेंबरपासून पुढील आठ दिवस रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे मोठी गावे, प्रमुख शहरांत होतील. यातून रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढला जाणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजय हा श्री. पवार यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. या निवडणुकीत सातारा जिल्ह्याने सर्वाधिक मतदान देत शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले. 

ऑनलाइन चित्रकला स्पर्धा 

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 80 वर्षांचा अपराजित योद्धा ही राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये विजेत्यांना अनुक्रमे 15 हजार, 10 हजार व पाच हजार अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!