स्थैर्य, सातारा, दि.१० : जिल्हा परिषदेत अनुकंपावरील नोकरभरतीसाठी पैसे घेतले जात असून, बदलीची ऑर्डर पुन्हा बदलण्यासाठी तीन लाख ते 50 हजार रुपये घेण्यात येत असल्याचा गंभीर आरोप सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. या प्रकरणाचे पुरावे श्री. गुदगे यांनी सभागृहात सादर करत माझ्याकडे कागदे बोलतात, असे ठणकावून सांगितले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या वेळी श्री. गुदगे यांनी अनेक विषयांवर आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा परिषदेत बदलीच्या अनुषंगाने अथवा एखादी समस्या मांडण्यासाठी कर्मचारी राजकीय नेत्यांची भेट घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नोकरीतून काढून टाकू, अशी धमकी देतात, तसेच नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांवर सह्या करताना माहिती घ्यावी. ऑगस्ट महिन्यात समुपदेशाने झालेल्या बदलीत काहींच्या ऑर्डर पुन्हा बदलण्यात आल्या, तसेच कार्यमुक्त न केलेल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची नावानिशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. काही जणांचे वारसपत्र नसताना नियुक्ती कशी दिली असा प्रश्न उपस्थित करत याबाबत सरसकट सर्वांची सुनावणी घेतली नसल्याचे श्री. गुदगे यांनी निदर्शनास आणून दिले.
शिवाजी सर्वगोड यांनी 76 हजार रुपयांचा दंड दोन हजार रुपयांत मिटवल्याचा आरोप करत या विषयाची तत्काळ माहिती द्या अन्यथा सभा चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावर अध्यक्ष उदय कबुले यांनी या विषयाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. धैर्यशील अनपट यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करत ते ठराविक लोकांची कामे करत असल्याचे सांगितले, तसेच धोत्रेंच्या कामाविषयीच्या तक्रारी विधान परिषदेचे सभापती, पालकमंत्र्यांपर्यंत गेल्याने त्यांची चौकशी करा, अशीही मागणी त्यांनी केली.