दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२३ | पुणे |
प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (३ ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
गेल्या पाच सहा महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना २० दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज त्यांनी प्राण सोडले.
ना. धों. महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे झालं. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते ’रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना.धों. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली.
‘अखेर वृक्ष उन्मळून पडला…’ – शरद पवार
शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो, असे पवार म्हणाले.