दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व हयात स्वातंत्र्यसैनिक अथवा मयत स्वातंत्र्यसैनिकांचे जोडीदार यांचा शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांचे जोडीदार यांचे वय विचारात घेता त्यांना कमी त्रास होईल, याचे नियोजन करून प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार डॉ. भक्ती देवकाते-सरवदे व अव्वल कारकून किशोर काकडे यांच्यामार्फत फलटण तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक यांचे जोडीदार श्रीमती तांबोळी गुलशनबाई जाफरभाई (रा. फलटण), श्रीमती कदम इंदिरा राजाराम (रा. डोंबिवली), श्रीमती कोलवडकर लिलाबाई विठ्ठल (रा. दालवडी), श्रीमती सावंत कृष्णाबाई बाबा (रा. वाठार), श्रीमती गायकवाड शकुंतला किर्तन (रा. फलटण), श्रीमती रणदिवे रखमाबाई बापू (रा. फलटण) यांच्या घरी जाऊन मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यापैकी श्रीमती कदम इंदिरा राजाराम यांना डोंबिवली, जि. ठाणे येथे जाऊन महसूल प्रशासनातर्फे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यामुळे ही सर्व कुटुंबे भारावून गेली.
यावेळी वरील स्वातंत्र्यसैनिक यांच्या वारसांशी त्यांना उद्भवणार्या प्रशासकीय अडचणींबाबत व त्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळाही देण्यात आला.