सातारा-सांगली विधान परिषद मतमोजणी: फलटणमधून कोण फुटणार? निकालाकडे सर्वांचे लक्ष

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सांगलीत सुरू आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत फलटणच्या ३१ मतांवरून कोणाची मते फुटणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २२ जून : सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यात थेट लढत असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि विशेषतः फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तब्बल ९९.७९ टक्के मतदान झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याने निकालाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा–सांगली मतदारसंघाच्या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत विजय मिळवून पश्चिम महाराष्ट्रातील आपले राजकीय वर्चस्व अधिक मजबूत करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठीही ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, आपले राजकीय प्राबल्य वाढविण्यासाठी पक्षाने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

या निवडणुकीच्या प्रचारात आमदार शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि विश्‍वजीत कदम यांनी महाविकास आघाडीची बाजू मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तर महायुतीकडून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची यंत्रणा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली होती. त्यामुळे हा निकाल दोन्ही आघाड्यांच्या राजकीय ताकदीची चाचणी मानला जात आहे.

फलटणच्या ३१ मतांचे गूढ

या निवडणुकीत फलटण बुथवर फलटण नगरपरिषदेच्या नगरसेवकांचे मतदान झाले आहे. येथे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एकूण ३१ मते आहेत. ही मते नक्की कोणाला मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. जर फलटण बुथवर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना मतदान झाले, तर महायुतीतून नक्की कोण फुटले? असा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!