
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२६ | यवतमाळ |
माहूर येथे विवाह करून परतणार्या एका कुटुंबावर महागाव तालुक्यातील सारखनी फाटा येथे चार अज्ञात युवकांनी जीवघेणा हल्ला करत सुमारे दोन लाखांची रोकड लुटली. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, विवाह करून परतणारी नववधूच दरोडेखोरांसोबत कारमधून फरार झाली. या संपूर्ण प्रकरणात पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आवारे कुटुंबातील युवकासाठी यवतमाळ येथे मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम पार पडला होता. या विवाहासाठी काशीराम नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी केली. संबंधित मुलीचे आई-वडील नसल्याचे सांगून माहूर येथील मंदिरात विवाह लावण्यात आला. विवाहानंतर सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास नवविवाहितांसह कुटुंबीय कारने परतीच्या प्रवासाला निघाले. प्रवासादरम्यान नववधू सतत मोबाईलवर कोणाशी तरी संपर्कात होती आणि आपले लोकेशन पाठवत असल्याचा संशय उपस्थितांनी व्यक्त केला आहे.
सारखनी फाटा येथे पोहोचल्यानंतर नववधूने लघुशंकेचे कारण सांगत वाहन थांबविण्यास सांगितले. चालकाने वाहन थांबवताच मागून आलेल्या पांढर्या रंगाच्या कारमध्ये ती जाऊन बसली. त्याचवेळी त्या कारमधून उतरलेल्या चार युवकांनी नवरदेवाच्या कारमधील चालक व इतरांवर हल्ला करून मारहाण केली. त्यानंतर गाडीत ठेवलेली सुमारे दोन लाख रुपयांची रोकड घेऊन नववधूसह संशयित पुसदच्या दिशेने पसार झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना लग्नाचे आमिष दाखवून नागरिकांची लूट करणार्या टोळीचे कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
