कराडात दोन हॉटेल बंद; तीन हॉटेलवर दंडात्मक कारवाई

दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२६ | कराड |
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर कराड शहरातील काही हॉटेलबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील विविध हॉटेलची अचानक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य थंड पेयाची विक्री व अन्य काही संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अन्य तीन हॉटेलांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.

ऑनलाइन पोर्टलवर नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी तपासणी केली. तपासणी दरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. काही खाद्यपदार्थ संशयास्पद आढळल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तपासणी अहवाल आणि प्रयोगशाळेच्या निष्कर्षानुसार संबंधित हॉटेलांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणार्‍यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

तासवडे औद्योगिक वसाहतीत गुळ सील
तासवडे औद्योगिक वसाहतीत पॅकिंगवर माहिती न देताच गुळाचे पॅकींग करून तो अन्यत्र पाठवण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आज सहाय्यक आयुक्त शिंगाडे व त्यांच्या पथकाने तेथे तपासणी केली. तेथे सुमारे तीन लाखांचा गुळ सील करण्यात आल्याचे शिंगाडे यांनी सांगीतले.

Back to top button
Don`t copy text!